ग्रामदैवते

गावचे मूळ ग्रामदैवत मारुती होय. पूर्वीच्या काळी गावोगावी वेशीतच मारुतीचे देवायल हे हमखास असायचेच कारण मारुती हा गावचा रक्षणकर्ता व बलोपासनेचे प्रतिक समजले जाते. त्यामुळेच बलोपासना वाढीस लागली हे देवालय गावाच्या वेशीवरच स्थापन केले आहे. त्याचप्रमाणे त्या देवालयात शंभूमहादेवाची काळयाभोर पाषाणाची पिंड आहे. बहुतेकांचे सालुंखे कदम या घराण्याचे ते कुलदैवत आहेत. तसेच गावातील भागवत साप्रदायिक व भजनी मंडळींनी त्या देवालयात विठ्ठल रुक्मिणीची मूर्तीही स्थापन केली आहे. ग्रामस्थ मंडळींनी शिवभवानी देवीचे मंदीरही 80–85 वर्षापूर्वी बांधले.

अलिकडच्या 8–9 वर्षाच्या काळात त्याचा जीर्णेध्दार करुन 8–9 लााखाचे सुंदर मंदीर बांधले आहे. भोसले घराण्यातील शिवाजी राजांचे वंशज साताराच्या भोसले महाराजांच्या हस्ते शिवभवानी देवीची प्राणप्रतिष्ठा केली आहे. याचे वैशिष्ठय म्हणजे भवानी देवी, शिवाजी राजा भवानी तलवार देते आहे अशी मूर्ती सांगलीच्या ओतारी या कारागीराकडून ही मूर्ती तयार करुन घेतली आहे. व तिची यात्रा फाल्गुन वद्य तृतीया या शिवजन्मतिथीवर आयोजित केली जाते. व हा शिवजयंती उत्सव मोठया प्रमाणात साजरा केला जातो. संपूर्ण महाराष्ट्रात फाल्गुन वद्य तृतियेला शिवजयंती उत्सव साजरा करणारे एकमेव गाव दुधोंडी होय.

मारुती देवालयात आश्विन महिन्यात नामसप्ताह साजरा केला जातो. मारुती जन्महाळ रामनवमी कृष्णाष्टमी वगैरे उत्सवही साजरे केले जातात.

गावामध्ये परिगोरीसाहेब या मुस्लिम संताचा उरुसही मोठया प्रमाणात साजरा केला जातो. त्याला सर्व समाजातील स्त्री-पुरुष परगावचे नातेवाईक सासुरवाशिणी लेकीबाकी हमखास येतात. व आनंद लुटताता हिंदु मुस्लीम ऐक्याचे हे प्रतिक आहे

अलिकडच्या काळात गणेश मंदीरही भक्तांनी बाधंले आहे.

तसेच लक्ष्मी(रेणुका) मंदीरही बांधले आहे. तशीच आणखी काही मंदीरे व देवस्थाने आहेत.

उदा. वेताळबा, नरसोबा दत्त बिरोबा आदि छोटी देवालये आहेत.

तेथे पाडव्याला बलीप्रतिपदेला वेताळबा यात्रा, दत्तजयंती लक्ष्मी यात्रा साज-या केल्या जातात व तीर्थ प्रसाद वाटला जातो.

याशिवाय गावात विविध गणेश मंडळे आहेत भाद्रपद शुक्ल चतुर्थीस ही मंडळे आपआपल्या गल्लीत गणेशाची स्थापना करतात. व गणपतीपुढे नाटके रेकॉर्डडान्स स्पर्धा वगैरे स्पर्धाचे आयोजन करतात. सजावटही उत्तम प्रकारे करतात त्यामुळे 10 दिवस जल्लोशचे वातावरण असते. गाव रात्रभर जागाच असतो म्हटल्यास अतिशयोक्ति होणार नाही. ही धामधूम सरते न सरते तोच नवरात्रीची नगारे वाजू लागतात.नवरात्रात दुर्गादेवीची स्थापना केली जाते. व रास दांडियाचे कार्यक्रम सुरु होतात. मुले-मुली या दांडियाच्या खेळात भाग घेतात. नव्हे त्यांच्याही स्पर्धा होतात. गावोगावच्या मुली-मुले स्पर्धेसाठी येतात व येथीलीही परगावी स्पर्धेसाठी जातात.